कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  कुरूंदवाड नगरपालिकेने कचरामुक्त शहरांमध्ये  थ्री स्टार मानांकन प्राप्त केले आहे. राज्यात १५ वा क्रमांक पटकावलेल्या प्रशासन आणि येथील लोकप्रतिनिधींना पालिकेच्या इमारतीवरील नामफलकाचे रंगरंगोटी स्वच्छतेचा मात्र विसर पडला आहे. याबाबत शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा, कचरामुक्त शहर राज्यस्तरावर मानांकन मिळवलेल्या संस्थानकालीन कुरुंदवाड नगरपरिषदेच्या ऐतिहासिक इमारतीवरील पालिकेच्या नामफलकाचे स्वच्छता अथवा रंगरंगोटी करण्याचे औदार्य दाखवले नाही. यामुळे कचरामुक्त शहर माझी वसुंधरा स्तरावर बक्षिसे मिळवणाऱ्या नगरपालिकेला खरोखरच हे मानांकन व बक्षिसे मिळाली आहेत का ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. १९८३ साली स्थापन झालेल्या संस्थानकालीन कुरुंदवाड नगरपालिकेला १३८ वर्षे पूर्ण झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न असो,  वा पायाभूत सुविधा याची प्रतीक्षा अजून नागरिकांना करावी  लागत आहे.

नगरपालिका प्रशासनाने हागणदारीमुक्त शहर,  कचरामुक्त शहर,  प्लास्टिकमुक्त शहर, माझी वसुंधरा तसेच कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा विविध स्तरावर चांगले काम केले आहे. २०२०-२१ अंतर्गत राज्यात १५ वा क्रमांक पटकावून मानांकन प्राप्त केले असले तरी पालिका इमारतीवरील नगरपालिका नामनिर्देश फलक मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. यासाठी पालिकेकडे निधी नाही का. तरी नगरपरिषदेने पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या नामफलकाची स्वच्छता करून रंगरंगोटी करावी अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.