बाजारभोगावच्या सरपंचपदी बाबासाहेब खोत, तर प्रकाश पोवार उपसरपंच…

0
34

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव, काऊरवाडी व मोताईवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. आज (गुरुवार) झालेल्या या निवडणुकीत बाबासाहेब श्रीपती खोत (काऊरवाडी) यांची सरपंचपदी तर प्रकाश रंगराव पोवार (बाजारभोगाव) यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व बाजारभोगावचे सरपंच नितीन पाटील यांचे  दोन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने व उपसरपंच मनिषा दत्तात्रय खोत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती. पदाधिकारी निवडीसाठी मागील पंधरा दिवसापासून घडामोडी सुरू होत्या.

रोहन गुरव, मनिषा खोत, नर्मदा पाटील, सविता नाईक यांच्या बळामुळे सरपंच – उपसरपंच निवड बिनविरोध करण्यात यश आले. तर अमोल गवळी, अपर्णा भोगावकर, श्वेता कांबळे व अमोल गवळी हे तीन सदस्य गैरहजर राहिले. निवडीनंतर नूतन सरपंच बाबासाहेब खोत यांनी दिवंगत सरपंच नितीन पाटील यांची प्रतिमा सरपंचांच्या खुर्चीवर ठेवून कार्याला सुरुवात केली. यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बाबासाहेब खोत यांच्या रूपाने काऊरवाडीला दुसऱ्यांदा सरपंचपदाचा बहुमान मिळाला आहे. नितीन पाटील यांच्या निधनामुळे कोणताही जल्लोष करण्यात आला नाही. या वेळी तलाठी अनिल पर्वतेवार, ग्रामसेवक सुभाष जाधव, दत्तात्रय शिंदे, अॅॅड. मोहन पाटील, माजी जि. प. सदस्य आनंदराव कांबळे, संदीप पाटील, सतीश पाटील, सुभाष सावंत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here