जिल्हा बँकेसाठी बबन रानगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

0
307

मुरगुड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील नेत्यांचे बिनविरोधसाठी प्रयत्न चालू आहेत. तरीही निवडणूक अंतिम टप्प्यात काय वळण घेईल याचा कोणालाच अंदाज नाही. त्यामुळं आजी-माजी आमदार खासदार, विद्यमान संचालक यांनीही आपले उमेदावरी अर्ज दाखल केले आहेत. धनगर समाजाचे नेते, मल्हार सेनेचे राज्याध्यक्ष बबन रानगे यांनी ही आपला अर्ज शक्तिप्रदर्शन करून दाखल केला आहे.

अर्ज दाखल करताना त्यांच्या सोबत सभासद व धनगर समाजाचे मातब्बर नेते उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांचे निकटवर्तीय आणि गोकुळचे संचालक बयाजी शेळके हे सुद्धा अर्ज दाखल करताना  रानगे यांच्यासोबत होते. रानगे हे गेली तीस वर्षे धनगर समाजाच्या न्यायहक्कांसाठी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्यासारख्या तळमळीच्या कार्यकर्त्याला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळावे ही कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांची अपेक्षा आहे.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बयाजी शेळके यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गोकुळचा संचालक करून जो न्याय धनगर समाजाला दिला. त्याची पुनरावृत्ती जिल्हा बँकेत बबन रानगे यांच्या रुपात होणार का ? हा औत्सुक्याचा विषय सर्वसामान्य धनगर बांधवांमध्ये चर्चिला जात आहे.