आयुर्वेदाची देवता ‘धन्वंतरी’

0
25

महाराष्ट्रात दिवाळीचा धनत्रयोदशी हा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस असतो वसुबारस! धनत्रयोदशी हा दिवस आश्विन महिन्याच्या त्रयोदशीला असतो. या दिवसाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवसाचे सांस्कृतिक महत्त्व देखील मोठे आहे.

धन्वंतरी हे चारभुजा धारी होते. त्यांच्या एका हातामध्ये आयुर्वेदाचा ग्रंथ/जळू, एका हातामध्ये औषधी कलश (अमृत कलश), एका हातामध्ये जडी बुटी आणि एका हातामध्ये शंख होता असे मानले जाते. या सार्‍या गोष्टींचा वापर करून मनुष्यजातीला चांगले आरोग्य मिळावे यासाठी उपचार केले जातात, असे समजले जाते. ज्या व्यक्तीने त्याच्या हयातभर आयुर्वेदाचा पुरस्कार केला असेल त्याला धन्वंतरी म्हटले जाते.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दीपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात (यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

धनत्रयोदशीबद्दल आणखी एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. शेतकरी नगर, तिफण, कुदळ, फावडे, इत्यादी शेतीच्या संबंधीत असलेली सर्व अवजारांची पूजा केली जाते, तर इकडे व्यापारी तिजोरी हिशोबाच्या वह्या सोने नाणे इत्यादीची या दिवशी पूजा करतो. या दिवसापासून नवीन हिशोबाची वही घालण्याची प्रथा आहे. बळीराजा शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने गुल खोबरे आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो.

धन, संपत्ती आणि आर्थिक वाढ व्हावी म्हणून देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लक्ष्मी देवी आणि कुबेर यांचे पूजन केले जाते. यामध्ये उपजीविकेसाठी उपयोगी असलेल्या सर्व वस्तूंचे म्हणजेच आपले काम व त्यासाठी उपयोगी असलेल्या वस्तूंचे पूजन केले जाते. ज्याद्वारे आपण धनप्राप्ती करतो, त्याचेही पूजन केले जाते. धन्वंतरी हे वेदांमध्ये निष्णात होते. मांत्रिक आणि तांत्रिक विद्या ते जाणत होते. अनेक उत्तमोत्तम औषधींचा लाभ त्यांच्यामुळे सर्व देवांना झाला. अमृतकुंभ रूपाने अनेक औषधांचा सार देवांना प्राप्त झाल्याने त्यांना देवाचे वैद्यराज म्हटले जाऊ लागले.