जवाहर कारखान्याचे साताप्पा सुतार, सुरेश पोवार यांना पुरस्कार प्रदान

0
78

इचलकरंजी (प्रतिनिधी) : हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगार साताप्पा सुतार व सुरेश पोवार यांना राज्य शासनाच्या कामगार कल्याण मंडळाकडून ‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. मुंबई येथे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते आणि प्रधान सचिव (कामगार) विनिता वदू-सिंघल व आयुक्त रविराज इळवे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटनात्मक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंत कामगारांना रोख रक्कम २५ हजार रुपये व सन्मान चिन्ह आणि पदक देऊन गौरविण्यात येते. साताप्पा सुतार यांचे साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात आणि सुरेश पोवार यांनी जवाहर साखर कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांसाठी संघटनात्मक केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून गौरविण्यात आले.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सुतार व पोवार यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. प्रकाश आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदी उपस्थित होते. सुतार व पोवार यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर आणि कामगार कल्याण भवन इचलकरंजी यांचे प्रोत्साहनपर मार्गदर्शन मिळाले, तर कारखान्याचे अधिकारी व कामगार संघटना (इंटक) यांचे सहकार्य लाभले.