कागल (प्रतिनिधी) : आ. प्रकाश आवाडे यांचा कागलबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण झाला आहे. कोणतीही माहिती न घेता ते सनसनाटी वक्तव्ये करीत आहेत, ती टाळावीत. असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कागलमध्ये बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की, आ. आवाडे दुसरा एक दावा करीत आहेत, की सीपीआरचे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा रद्द झालेला आहे. तसेच आयजीएमचा दर्जा दुसरीकडे म्हणजेच गडहिंग्लजला देण्याचा माझा प्रयत्न आहे. जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज हे वेगवेगळे आहेत. जिल्ह्याचे रुग्णालय हे जिल्ह्यातच असतं तर मेडिकल कॉलेज शेंडा पार्कमध्ये होणार आहे. त्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, सर्व सुविधांसह आयजीएमची बेड क्षमता ५०० करण्याचे उद्दिष्ट मी पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ठरविले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय दुसरीकडे कुठेही, कुणीही नेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तसे होऊ देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच हातकणंगले तालुक्यात पहिला डोस एक लाख, ७७ हजार, ५६५ व दुसरा डोस ४४ हजार, ७२८ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. कागल तालुक्यात पहिला डोस ७० हजार ९९१ व दुसरा डोस १२,५५७ इतके लसीकरण पूर्ण झाले आहे. पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्के हा राज्याच्या व देशाच्या तुलनेत जास्तच आहे. त्यामुळेच मृत्यूमध्ये कोल्हापूर जिल्हा एक नंबरवर आहे‌. हॉटस्पॉट म्हणून घोषित गावांवर लक्ष केंद्रित करा. तिथे चाचण्यांसह सर्वेक्षण आणि उपचार मोहीमही जोरात राबवा, अशा सूचनाही ना. हसन मुश्रीफ यांनी दिल्या.