भेटण्यास टाळाटाळ केल्याने प्रेयसीला संपवले

0
266

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील सिव्हील हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षक महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. भेटण्यास टाळाटाळ केल्याच्या रागातून प्रियकराने सुरक्षारक्षक असलेल्या प्रेयसीवर तलवारीने सपासप वार करून खून केले. सुधाराणी बसाप्पा हडपद (वय २७, रा. बेळगाव, मूळ रा. मुगबसव, ता. बैलहोंगल) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रियकर  इराण्णा बाबू जगजंपी (वय २४, रा. आश्रय कॉलनी, जनता प्लॉट बैलहोंगल) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मूळची मुगबसव येथील सुधाराणीचा सात वर्षांपूर्वी कित्तूर येथील तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतर त्यांना मूल झाले. परंतु, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यामुळे पाच वर्षांपासून सुधाराणी ही आपल्या माहेरी मुगबसव येथे राहात होती. ती सिव्हील हॉस्पीटलमध्ये महिला व बाल चिकित्सा विभागाजवळ सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होती.

मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळी आठ या वेळेत सुधाराणी व तिची सहकारी गायत्री चिदानंद कलमठ (रा. तारीहाळ, सध्या शिवाजीनगर) या दोघी होत्या. सकाळी आठ वाजता शिफ्ट संपण्यापूर्वी सकाळी साडेसात वाजता संशयित इराण्णा हा बाल रूग्ण विभागाच्या पाठीमागील बाजूला आला होता. यानंतर तो सुधाराणीशी काही सेकंदच बोलला व त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.

इराण्णाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या अडीच वर्षांपासून या दोघांचे एकत्र फिरणे होते. या काळात आपण तिच्यासाठी सुमारे दीड लाख रूपये खर्च केल्याचे इराण्णाचे म्हणणे आहे. परंतु, गेल्या तीन-चार महिन्यांपासून सुधाराणी ही आपल्या भेटण्यास टाळाटाळ करीत होती. तसेच फोन देखील घेत नसल्याने इराण्णाचा तिच्यावर राग होता. याच रागातून बुधवारी सकाळी त्याने बेळगावात येऊन सुधाराणीवर तलवारीने हल्ला केला.