‘अवनी-एकटी’तर्फे सोमवारपासून  ‘प्लास्टिकमुक्त राजारामपुरी’ अभियानाचा प्रारंभ

0
52

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील अवनी व एकटी संस्थेच्या वतीने कोल्हापूर शहर प्लास्टिकमुक्त व्हावे तसेच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी ‘प्लास्टिकमुक्त कोल्हापूर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवार दि. १५ रोजी ‘प्लास्टिक मुक्त राजारामपुरी’ या अभियानाची सुरुवात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत दिली.

भोसले यांनी सांगितले की, महापालिकेच्या सहकार्याने अवनी व एकटी संस्था शहरातील ओला व सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे काम करत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असा प्लास्टिक कचरा वर्गीकरण करणे व त्याचा पुनर्वापर करणे यासाठी संस्था काम करत आहे. सध्या संस्था राजारामपुरी भागातील व्यावसायिक आस्थापनांचा सुका कचरा संकलन करते. यातून वर्गीकरण करून प्लास्टिक शिरोली नाका येथील प्लास्टिक श्रेडींग युनिट येथे पुनर्वापरासाठी कटिंग केले जाते. महापालिका ते रस्त्याच्या कामात वापरते. त्यामुळे सध्या निरुपयोगी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात पुनर्वापरात येत आहे. वर्षभरात एक टनाहून अधिक प्लास्टिक वापरण्यात आले आहे. त्यामुळे राजारामपुरी भागातील सुका कचरा संकलन करून तो पुनर्वापरात आणण्याच्या दृष्टीने संस्था काम करणार आहे. या कामात राजारामपुरीतील सामाजिक संस्था व कार्यकर्ते, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष संजय पाटील, सेक्रेटरी प्रा. डॉ. अर्चना जगतकर, दुर्गेश लिंग्रस, अॅड. बाबा इंदुलकर, डॉ. सुरज पवार, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली बाड, डॉ. संदीप पाटील, कचरावेचक संघटनेच्या जिल्हाप्रमुख संगीता लाखे उपस्थित होत्या.