उत्तराखंड (वृत्तसंस्था) : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावातील  जोशी मठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळला. त्यामुळे धरण फुटून धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्ट वाहून गेला आहे. अचानक पूर आल्याने नदीकाठावरील घरांना मोठा तडाखा बसला आहे. अनेकजण बेपत्ता झाले आहेत. हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी केला आहे. जोशी मठाच्या नुकसानीबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीला मोठा पूर येण्याची  शक्यता आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर पाण्याचा मोठा प्रवाह नदीतील धरणात येताना दिसत आहे. पाण्याच्या तडाख्यात नदीवरील दोन पूल वाहून गेले आहेत. एसडीआरएफचे पथक आले असून मदतकार्याला सुरूवात करण्यात आली आहे.