कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील अवचितवाडी येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अवचितवाडी गावाला भेट दिली. यावेळी ना. मुश्रीफ यांनी अधिकारी, ग्रामस्थांसमावेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यू साथीची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांनी घरोघरी सर्वेक्षण व तातडीच्या दर्जेदार औषधपचारांबरोबरच अनुषंगिक सेवा देण्याच्या कडक सूचना प्रशासनाला दिल्या. 

तसेच ना. मुश्रीफ यांनी गावातून फिरून पिण्याचा पाणीपुरवठा,  सांडपाणी व्यवस्था या पाहणीबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेची पाहणी केली. तर डेंग्यूसदृश्य साथीमध्ये मृत पावलेल्या चार ग्रामस्थांच्या कुटुंबीयांना ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून प्रत्येकी पंचवीस हजारांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केली.

या बैठकीत मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डवरी यांच्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. रुग्णांना अॅडमिट करून घेतले जात नाही, वेळेवर उपचार केले जात नाहीत, वैद्यकीय कर्मचारी उद्धट वर्तन करतात अशा तक्रारी केल्या. यावर मुश्रीफ यांनी डॉ. डवरी यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच कामाच्या पद्धतीत सुधारणा न झाल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील,  प्रवीणसिंह भोसले, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, सरपंच उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.