कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती वीज कनेक्शन तोडल्याने संभाजीनगर येथील एका रिक्षाचालकाने चक्क महावितरण कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारीन, अशी धमकी दिल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. आज (शनिवार) दुपारी सावित्रीबाई फुले रुग्णालय परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ हा प्रकार घडला.

सुमारे दीड तास या रिक्षा व्यावसायिकाने महावितरणच्या चौथ्या मजल्यावर बसून आपला संताप व्यक्त केला. शोले स्टाईलने दिलेल्या इशाऱ्यामुळे या वीज ग्राहकाने पोलीस प्रशासन, अग्निशमन दल, महावितरण प्रशासनाची तारांबळ उडवली. त्याला घरात वीजकनेक्शन जोडल्याची फोनवरुन माहिती दिल्यानंतर तो इमारतीवरुन खाली उतरला.