मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादसह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचे प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवले गेली. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे ‘धाराशीव’ असे नामकरण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव आता देण्यात येणार आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी जुनी होती. १९८८ मध्ये औरंगाबादेत शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवल्याची घोषणा केली. तेव्हापासून शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर म्हणत, तर शिवसेनेकडून उस्मानाबादचे नाव धाराशीव ठेवा अशी होती. शिवसेनेच्या ‘सामना’ मुखपत्रातूनही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि उस्मानाबादचा उल्लेख ‘धाराशीव’ करण्यात येत असे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी जून १९९५ मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत ठराव मंजूर झाला. तो राज्य सरकारकडे पाठवला. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार होते. या निर्णयाला उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर १९९६ मध्ये सरकारने संभाजीनगर नावावर आक्षेप आणि सूचना मागवणारी अधिसूचना काढली. या अधिसूचनेलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. या काळात आघाडी सरकार आले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही अधिसूचना मागे घेतली.

औरंगाबाद महापालिकेत २०१० मध्ये शिवसेना-भाजप सत्तेत आले. त्यांनी २०११ मध्ये पुन्हा औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारडे पाठवला. काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर २०१५, २०१७ मध्ये नामांतराची मागणी झाली होती.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. खरे तर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता; मात्र या निर्णायाला विरोध करत स्थानिकांनी दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी केली. त्यासाठी स्थापन झालेल्या कृती समितीने मानवी साखळी करून आंदोलन केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

नामांतराच्या मुद्द्यावरून ही बैठक गाजत आहे. ऐन बैठकीतून काँग्रेसचे दोन मंत्री नाराज होऊन काही वेळापूर्वीच बाहेर पडले आहेत. यात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. मुख्यतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, बैठकीत मंजुरी मिळाल्याने त्यांची पुढील भूमिका काय हे आता लवकरच स्पष्ट होईल.