कुंभोज (प्रतिनिधी) :  येथील खानगोंड गल्लीत डॉ. अभिजित कोरे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने शुक्रवारी रात्री अंदाजे चार लाख रुपयांहून अधिक रकमेचा मुद्देमाल लंपास केला आहे.

डॉ. अभिजित कोरे यांनी बाहुबली येथे नूतन घर बांधल्याने तेथे नुकतेच वास्तव्यास गेले आहेत. त्यांच्या जुन्या घरामध्ये कोणी नसल्याची पाहून रात्री बारानंतर घराचा कडीकोंडा तोडून तीन ते चार किलो चांदीची भांडी, चांदीच्या मूर्त्या, रोख रक्कम ५० हजार रुपये, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, महागडे घड्याळ असा ऐवज चोरट्याने लंपास केला.

डॉक्टर रात्री ११ वाजता बाहुबलीतील घरी गेले होते. सकाळी डॉक्टरांच्या घरी ओपीडीसाठी काही रुग्ण आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे  दिसला. नंतर पाहिले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले याबाबतची फिर्याद हातकलंगले पोलिसांत दाखल केली आहे.