कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाने आपल्या कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ देऊ केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उलाढालीचा वेग मंदावला असतानाही संघाने आपल्या २०४५ कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रु. पगारवाढ दिल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील १२ व्‍या त्रैवार्षिक कराराची बैठक काल (शुक्रवार) ११ पार पडली. पगारवाढीच्‍या संदर्भात व्‍यवस्‍थापन व कर्मचारी संघटना यांच्‍यातील खेळीमेळीच्‍या चर्चेतून कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ व्‍यवस्‍थापन मंडळाने दिली. पगारवाढीची एकूण रक्कम ९ कोटी ६० लाख इतकी होत आहे.

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्‍याने उद्योगधंदे अडचणीत आले असून, आर्थिक उलाढाल थांबली आहे. मात्र आ. पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्‍या नेतृत्‍वाखाली चेअरमन रवींद्र आपटे यांनी सुयोग्‍य नियोजन करून गोकुळचे आर्थिक चक्र गतिमान ठेवले. सर्व संचालक, कर्मचारी, वितरक व ग्राहक यांनी जिवाची बाजी लावून काम केले आहे. त्‍यामुळेच लक्षावधी दूध उत्‍पादकांना कोरोनाच्‍या काळात कोणतीही आर्थिक झळ बसू न देण्‍याचा प्रयत्‍न संघ व्‍यवस्‍थापन व कर्मचारी यांनी केला आहे. त्‍याचेच फळ म्‍हणून ही पगारवाढ देण्यात आली आहे.

चेअरमन रविंद्र आपटे, संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे, विश्‍वास जाधव, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर यांनी बैठकीमध्‍ये संघटना प्रतिनिधींशी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा केली. या पगारवाढीस संघटना प्रतिनिधींनी होकार दिला. या वेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्‍यक्ष कॉ. एस. बी. पाटील, उपाध्‍यक्ष संजय सावंत, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्‍ही. डी. पाटील, मल्‍हार पाटील, संभाजी देसाई, लक्ष्‍मण पाटील, संग्राम मगदूम आणि संघाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.