रक्षाबंधनासाठी आकर्षक राख्यांच्या दुकानांनी सजली वस्त्रनगरी…

0
14

इचलकरंजी (प्रतिनिधी) : लॉकडाउन आणि महापूराच्या परिस्थितीमुळे गेल्या दीड वर्षभरात इचलकरंजी शहरात अनेक सण उत्साहात साजरे करता आलेले नाहीत. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. रविवारी (दि. २२) साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांच्या दुकानांनी वस्त्रनगरी सजली आहे.

भावाबहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन सण असल्याने शहर व परिसरातील युवती व महिलांनी राखी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. कोरोना काळात सण साजरे करण्यास परवानगी नसल्याने व्यापारी वर्गास मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. दरम्यान, प्रशासनाकडून शिथिलता मिळाल्याने शहरातील बाजारपेठा पुन्हा सज्ज झाल्या आहेत. व्यापाऱ्यांसह महिला वर्गामध्ये देखील उत्साह जाणवत आहे. शहरातील मेनरोडवर महिला व युवतीनी राख्या खरेदीसाठी गर्दी केली आहे. तर कापड दुकानातही खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु नागरिकांनी गर्दी न करता काळजी घेण्याचीही गरज आहे.