कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील महापालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपणार आहे. यामुळे इच्छूक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण निवडणूक प्रशासनाकडून वॉर्ड आरक्षणाच्या हालचाली सुरू नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढत आहे. विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी केली असली तरी स्वत:चे वॉर्ड कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे निश्चित नसल्याने तेही चिंतेतच आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी संपर्क वाढवला आहे. काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकात जाधव, राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर, भाजपचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी संपर्क वाढवला आहे. प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. पण संभाव्य नावेही निवडताना प्रभाग आरक्षणचा अडथळा ठरत आहे. आरक्षण कोणासाठी आहे हे माहित नसल्याने कोणास तयारी कर, असे सांगायचे असा प्रश्न नेत्यांसमोरही उभा राहत आहे.

विद्यमान सभागृहातील बहुतांशी नगरसेवक पुन्हा रिंगणात येण्यास इच्छुक आहेत. ते स्वत:चा वॉर्ड आरक्षित झाल्यास जवळपासच्या वार्डातून निवडणूक लढवण्यासाठीही चाचपणी करत आहे. म्हणूनच इच्छुक दसऱ्याच्या मुहूर्तावर अधिकाधिक मतदारांपर्यंत शुभेच्छा पोहचवण्याचे काम केले आहे. काही इच्छुकांनी शुभेच्छा पत्रासह भेटवस्तूही पोहोच केल्या आहेत. अशाप्रकारे महापालिका निवडणुकीच्या हालचाली गतीमान होत आहेत.

सभागृहातील सध्याचे आरक्षण

एकूण प्रभाग ८१

पुरुष राखीवर प्रभाग ४०

महिला राखीव प्रभाग ४१

ओबीसी राखीव प्रभाग २२

सर्वसाधारण (खुला वर्ग) २४