कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  जनरेटरच्या सहाय्याने क्रेन सुरु करून, शिंगणापूर उपसा केंद्रातील मोटरी सोडविण्याचे काम सुरु केले आहे.  क्रेनच्या सहाय्याने त्या बाहेर काढून, त्या दुरुस्तीला देण्याचा प्रयत्न सुरू असून, शिंगणापूर उपसा केंद्रावरून पाणी पुरवठा लवकर सुरू व्हावा यासाठी प्रयत्नशिल असल्याची माहिती आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिली.

महापूराच्या पाण्यात महापालिकेचे शिंगणापूर येथील उपसा केंद्र पाण्याखाली गेले होते. आमदार जाधव शिंगणापूर येथील उपसा केंद्रास भेट देऊन, पाहणी केली. यावेळी आमदार जाधव म्हणाले, पाणी पातळी कमी झाल्यानंतर मोटर काढून, त्या दुरुस्त करून, त्या जोडायच्या यामध्ये खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे आज जनरेटर उपलब्ध करून, त्या जनरेटरच्या सहाय्याने उपसा केंद्रातील क्रेन सुरू केल्या. क्रेनच्या सहाय्याने पाणी उपसा करणाऱ्या मोटरी सोडवून घेण्याचे काम सुरु केले आहे. त्यानंतर मोठ्या क्रेनच्या सहाय्याने मोटरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र पाण्याची पातळी व प्रवाहामुळे क्रेन आतमध्ये जाऊ शकली नाही. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर मोठ्या क्रेनच्या सहाय्याने मोटरी बाहेर काढण्यात येणार असून, त्वरित त्या मोटरी काढून दुरुस्तीला देण्यात येणार आहे.

मोटरी दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर करून, उपसा केंद्र लवकर सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले. यावेळी जल अभियंता साळुंखे, हिंदुस्थान ट्रेल्स इलेक्ट्रिकलचे मोमीन व पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, जनतेने त्यांची काम करावीत म्हणून मला निवडणून दिले आहे.  कोणतेही काम असो, ते स्वतः काम पूर्ण करून घ्यायचे, या दृष्टीने मी प्रयत्नशील असतो, कारण स्वतः पूर्ण केलेल्या कामावरच, माझा विश्वास आहे. जनतेपर्यंत सुविधा पोचविण्यासाठी मी सतत काम करत राहीन.