कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना राजारामपुरी पोलिसांनी आज (शुक्रवार) बेड्या ठोकल्या. त्याना न्यायालयात हजर केले असता ९ ऑगस्टपर्यंतची पोलिस कोठङी सुनावण्यात आली आहे. अनिकेत अनिल हळदकर (वय २७, रा. चंद्रे, ता. राधानगरी) आणि उत्तम शिवाजी पवार (२३, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, ता. राधानगरी) अशी दोघांची नावे आहेत.

अनिकेत अनिल हळदकर हा दिनांक २ ऑगस्ट रोजी राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला. तेथे त्याने त्याच्या खात्यावर दोन हजारांच्या ६७ नोटा जमा केल्या. यावेळी बँक कर्मचाऱ्यांना ६७ पैकी १७ नोटा संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. शिवाय सर्व नोटा एकाच सिरीयल क्रमांकाच्या असल्याने त्यांचा संशय बळावला. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास संपर्क साधून याविषयी माहिती दिली. पोलीसांनी अनिकेत हळदकर याला ताब्यात घेतले. चौकशीअंती उत्तम पवार याने या बनावट नोटा खपवण्यासाठी हळदकरकडे दिल्याचे निष्पन्न झाले.

पोलीसांनी काल (गुरुवार) रात्री उशिरा उत्तम पवार याला पालकरवाडी येथून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या शेतातील खोलीवर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, उपनिरीक्षक दीपिका जोगळे आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी नोटा छपाईसाठी लागणारी यंत्रसामुग्री, कागद आणि प्रिंटर असे साहित्य पोलीसांनी हस्तगत केले. आज या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठङी सुनावली आहे.