पोलीस मुख्यालयाच्या दारात ‘एका’ गुंडाचा आत्मदहनाचा प्रयत्न…

0
291

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूरातील आरसी गँगचा योगेश पाटील याने आज (गुरुवार) रात्री आठच्या सुमारास पोलीस मुख्यालयाच्या आवारात कुटुंबासहीत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीसांनी त्याला वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

योगेश पाटील याच्यावर खून, खंडणी, मारामारी सारखे भीषण गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांचे निकाल लागले असून काही निकाल प्रलंबीत आहेत. याप्रकरणी योगेश याला चौकशीसाठी वारंवार पोलीस मुख्यालयात बोलावले जात होते. यासाठी आज योगेश पाटील आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला वारंवार चौकशीसाठी का बोलावले जात आहे असा जाब विचारण्यासाठी गेले होते.

यावेळी योगेश याने पोलीसांना, मी यातून बाहेर पडलो आहे. तरीही मला इथे बोलावून दिवसभर बसवून ठेवता. असे सांगत त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी अंगावरती रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी योगेश आणि पोलीसांची झटापटही झाली. पोलीसांनी वेळीच सावधानता दाखवत योगेशला रोखत पुढील कारवाईसाठी त्याला शाहुपूरी पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले.