टोप (प्रतिनिधी) : मातोश्री रमाबाई आंबेडकर सहकारी सूतगिरणी कासारवाडी येथील प्रशासकीय कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे चेअरमन अनिल कवाळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. तसेच स्थानिक आमदारांनी प्रशासनावर दबाव आणून सूतगिरणीवर प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही अनिल कवाळे यांनी केला आहे.

हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील रमाबाई आंबेडकर सहकारी सूतगिरणीवर प्रशासक नेमण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाच्या वतीने स्थगिती देण्यात आली. संस्थेचे चेअरमन अनिल कवाळे यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. तसेच स्थानिक आमदार राजू आवळे यांच्या तक्रारीनुसार संस्थेवर प्रशासक आणण्याची कारवाई झाली होती असा आरोप अनिल कवाळे यांनी केला.

पत्रकात म्हटले आहे की,  तथाकथित सत्यशोधन समितीचे अध्यक्ष  प्रशांत चांदणे यांच्या संस्थेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या घडामोडी पाहता तसेच संस्थेला बाधा येणाऱ्या कृत्याची दखल घेऊन संस्थेच्या हिताविरुद्ध गेल्याने सहकार कायद्याच्या नियमानुसार सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. तसेच या सत्यशोधन समितीच्या स्वयंघोषित अध्यक्षाला एकाही सभासदाचा पाठिंबा नाही. संपूर्ण सभासदांच्या मालकीची असणारी व रमाबाई आंबेडकर यांच्या नावाची स्मारक असणारे एकमेव मागासवर्गीय संस्था असून काही राजकीय पुढारी स्वयंघोषित नेत्यांच्या वतीने संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, संस्थेचे संचालक आणि सभासद मंडळ त्यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत.

संस्थेच्या कामकाजाबाबत उपायुक्त, वस्त्रोद्योग सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी अहवाल पाठवलेले आहेत. तसेच त्यांनी ही वेळोवेळी तपासणी केलेली आहे. मात्र, संस्था गिळंकृत करण्याच्या उद्देशाने गेले काही दिवस हालचाल करणाऱ्या स्थानिक आमदारांच्या दबावापोटी करण्यात आलेली प्रशासकाची नियुक्ती न्यायालयाने खोटी ठरवून त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. हा संस्थेच्या दृष्टीने एक  महत्त्वपूर्ण निर्णय आहे. संस्थेच्या संचालक मंडळाचे अपार कष्ट आणि पाठपुरावा यामुळे २५ हजार चात्यांची सुतगिरण उत्पादनास तयार झाली आहे. येत्या ३० सप्टेंबर पासून प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे चेअरमन कवाळे यांनी सांगितले

यावेळी अजित आवळे, विजय वाघ, मधुकर राऊत, गौतम कांबळे आदी संचालक उपस्थित होते.