मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात गुरुवारी सकाळी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या उत्तरेकडील उपनगरातील मिल पार्कमध्ये असलेल्या बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला आहे.

स्वामीनारायण मंदिरावरील हल्ल्यानंतर बीएपीएस यांनी काढलेल्या निवेदनात स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर विनाश आणि द्वेषाच्या धक्कादायक घोषणा लिहिण्यात आल्याचे म्हटले आहे. या हल्ल्याचा बीएपीएस यांनी निषेध केला आहे. याशिवाय, ‘आम्हाला या रानटी आणि द्वेषाच्या कृत्यांमुळे दुःख आणि धक्का बसला आहे. आम्ही शांतता आणि सौहार्दासाठी आमची प्रार्थना करतो आणि लवकरच या घटनेबद्दल अधिक तपशील शेअर करू’, असेही म्हटले.

खलिस्तान ग्रुपने भारतीय दहशतवादी जर्नेल सिंग भिंडरनवाले याचे कौतुक केल्याचेही या अहवालात म्हटले आहे. भिंडरनवाले हे ऑपरेशन ब्लू स्टार दरम्यान मारले गेलेल्या खलिस्तानी शीख राज्याचे व्यापक समर्थक होते.

नॉर्दर्न मेट्रोपॉलिटन रीजनचे उदारमतवादी खासदार इव्हान मुलहोलँड यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘मंदिराची ही तोडफोड व्हिक्टोरियातील शांतताप्रिय हिंदू समुदायाला, विशेषत: या पवित्र वेळी अत्यंत त्रासदायक आहे’ अशी माहिती खासदार इव्हान मुलहोलँड यांनी दिली. अमित सरवाल नावाच्या पत्रकाराने सांगितले की, मेलबर्नमध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायाने पोलिस आणि खासदारांकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.