गारगोटी (प्रतिनिधी) : अथणी शुगर्सच्या भुदरगड युनिटने यंदाच्या हंगामामध्ये साडेचार लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपला नोंदणी केलेला सर्व ऊस गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश पाटील यांनी केले. ते आज (बुधवार) तांबाळे येथील कारखाना साईटवर २०२०-२१ च्या गळीत शुभारंभप्रसंगी बोलत होते. पाटील यांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले.

मुख्य शेती अधिकारी एल. बी. देसाई यांच्या हस्ते वाहन पूजन, चीफ इंजिनिअर नामदेव भोसले यांच्या हस्ते काटा पूजन झाले. केनयार्ड विभागामध्ये सत्यनारायण पूजा कारखान्यातील कर्मचारी आशिष रेपे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते पार पडली. पाटील म्हणाले की, अन्य साखर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येणार आहे. शेतकऱ्याने पिकवलेल्या उसाला चांगला दर मिळालाच पाहिजे, ही भूमिका नेहमीच कारखान्याचे चेअरमन श्रीमंत पाटील यांनी ठेवली आहे. त्यामुळे मागील चार हंगामांमध्ये वेळेवर बिल देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच चालू हंगामत येणाऱ्या उसाला प्रति टन एक किलो साखर सवलतीच्या दरात देण्यात येईल.

कारखान्याचे कार्यालय अधीक्षक बाबासाहेब देसाई यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. यावेळी ऊस पुरवठा अधिकारी शशिकांत थोरवत, लेबर ऑफिसर कन्हैया गोरे, अकाउंटंट जमीर मकानदार, विनायक पाटील, सतीश पाटील, अविनाश गुरव, अमोल केणे, सुनील घुगरे, जगदीश घोरपडे, सर्व खातेप्रमुख यांचेसह शेतकरी, कामगार, तोडणी वाहतूकदार उपस्थित होते.