जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. अशातच जळगाव तालुक्यातील एका लग्नाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचे भाऊ-भावजय यांना कोरोनाने गाठले आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात विवाह सोहळ्यानंतर नवरदेवासह त्यांचे वडील, भाऊ, भावजयी आणि अन्य एक जण असे पाच जण कोरोना बाधित झाले. शिरसोली गावात दोन दिवसात सात बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
१६ फेब्रुवारीला विवाह सोहळा आटोपल्यानंतर नवरदेवासह त्यांच्या नातेवाईकांना कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली. त्यांनी तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाने बाधित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत. तसंच संशयित असलेल्या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.