टोकियो (वृत्तसंस्था) : येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारताला अॅथलेटिक्समध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास घडवला. या स्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक आहे. नीरज चोप्राच्या या सुवर्णमयी कामगिरीमुळे सर्व देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी नेमबाजपटू अभिनव बिंद्राने २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.

काही क्रीडाप्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्याने ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळणार की नाही, याबाबत देशवासीयांच्या मनात शंका होती. मात्र नीरज चोप्राने भालाफेकीमध्ये अंतिम फेरी गाठल्याने सर्वांच्या आशा त्याच्यावर केंद्रित झाल्या होत्या. नीरजने ८७.८८ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.  यापूर्वी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते.

नीरजने पहिल्या प्रयत्नात ८७.०३ मीटर, दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर, तर तिसऱ्या प्रयत्नात ७६.७९ मीटर भालाफेक केली. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. फायनलमध्ये दुसरा कोणताही खेळाडू नीरज चोप्राच्या जवळपासही आला नाही. नीरजचा एकट्याचा थ्रो ८७ मीटरच्या पुढे गेला. चेक रिपब्लिकच्या जाकुब वैडेलीचचा थ्रो ८६.६७ मीटर आणि वितेस्लाव वेसलीचा थ्रो ८५.४४ मीटर एवढा गेला, त्यामुळे त्यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पडक मिळालं.  चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात नीरजचा फाऊल झाला असला, तरी दोन प्रयत्नांच्या जोरावर त्याने सुवर्णपदक पटकावले.

अभिनव बिंद्राने चीनमधील बीजिंग येथे २००८ साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतरच्या ऑलिम्पिक स्पर्धांत सुवर्णपदक मिळवून देण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले होते. आज तब्बल १३ वर्षांनी देशाला नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवून दिले आहे. त्याच्या या अप्रतिम कामगिरीने देशभरात जल्लोष होत आहे.