राशिवडे येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा सर हिसकावला   

0
1090

राशिवडे (प्रतिनिधी) : नागेश्वर मंदिर ते राशिवडे बुद्रुक रस्त्यावर एका ८० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचा सर हिसकावून चोरट्यांनी पलायन केले. ही घटना आज (शनिवार) दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेली माहिती अशी, नागेश्वर मंदिर ते राशिवडे बुद्रुक रस्त्यावरून लक्ष्मीबाई रामचंद्र पोवार ही वृद्ध महिला घरी येत असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञात दोघा जणांनी तिला थांबवले. त्यानंतर चौकशी करत आसपास कोणी नसल्याचा अंदाज घेऊन या वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक तोळ्याचा सर हिसकावून घेऊन पलायन केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत वृद्ध महिलेस धक्का दिल्यामुळे मुका मार बसला. सदरचे आरोपी राशिवडे चांदे रस्त्यावरून चांदेकडे गेल्याचे समजते. राशिवडे सारख्या मोठ्या गजबजलेल्या गावात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणाची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.