नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा (मंगळवार) २० वा दिवस आहे. या आंदोलनाचा प्रतिकूल परिणाम तीन राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशचे दररोज एकूण
३, ५०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाने  (ASSOCHAM-असोचेम) केला आहे.

असोचेमने म्हटले आहे की, या आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था परस्पर जोडलेली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे परिवहन यंत्रणेवर परिणाम झाला असून पुरवठा साखळी तुटली आहे. यामुळे देशभरातील बाजारात फळ आणि भाज्यांचे दर वाढले आहेत. देशात लॉकडाउन उघडण्यास सुरुवात होत असताना हे आंदोलन छेडले गेले. याचा फटका शेतकरी, ग्राहक आणि उद्योगांना बसत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे आवाहन चेंबरच्या सरचिटणीसांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटना आपल्या मागण्यांविषयी मागे हटण्यास तयार नाहीत.