कोल्हापूर (प्रतिनिधी) : कळंबा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोघा कैद्यांनी एक कैद्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. मकरंद उर्फ मारुती बाबासाहेब मोटे (वय ४६, मूळ रा. धनगरवाडी, जि, सातारा, सध्या रा. कळंबा कारागृह) असे जखमी कैद्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी मेहुल संदीप पाटील (मूळ रा. लोणंद, जि. सातारा सध्या रा. कळंबा कारागृह) व विराज उर्फ बापू विजयकुमार गरुड (मूळ रा. पाडेगाव फार्म, जि. सातारा) या यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

खून व गंभीर गुन्ह्यांमध्ये मकरंद मोटे, मेहुल पाटील व विराज गरुड हे तिघे कळंबा कारागृहामध्ये बंदी आहेत. आज (गुरुवार) सकाळी पूर्वीच्या वादातून मेहुल पाटील व विराज गरुड या दोघांनी मकरंद मोटे याला बरॅकबाहेर बोलावून त्याच्यावर लोखंडी खिळ्याने हल्ला केला. त्यात मारुती मोटे गंभीर जखमी झाला. जुना राजवाडा पोलिसांना मेहुल पाटील व विराज गरुड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, या प्रकाराने कळंबा कारागृहाचा पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.