(प्रतिनिधी) : कोल्हापूरची उदयोन्मुख धावपटू कु. आसमा अजमल कुरणे  प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीरोजी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ७२ किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम करणार आहे.  ७२ किलोमीटरचे अंतर अवघ्या १४ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण करुन जागतिक विक्रम नोंदवण्याचा तिचा मानस आहे.

हा उपक्रम यशस्वी झाल्यास ६ आणि ७ फेब्रुवारीरोजी जागतिक सर्वसाधारण विजेतेपदासाठी १०० किलोमीटर अंतराच्या एआययू एशिया ओसीनिया मॅरेथॉन चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी  तिला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

आसमा कमला कॉलेजमधून कला शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे.  शामराव मासाळ यांच्याकडून तिला प्रशिक्षण मिळत आहेत.  इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी ती खडतर परिश्रम घेत  आहे.  २६ जानेवारीरोजी प्रजासत्ताक दिनी सकाळी ६ वाजता आसमा कुरणे कमला कॉलेजच्या आवारातून  जागतिक विक्रमासाठी धावण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहे. कुठेही न थांबता सलगपणे धावून विक्रम नोंदवण्याचा तिचा मानस आहे.