कोल्हापूर (प्रतिनिधी) : रहदारीचे नियम मोडल्यामुळंंच अनेकदा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळं अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केलंय. ते आज (गुरुवार) केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियानाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

प्रादेशिक परिवहन विभाग कोल्हापूर आणि पन्हाळा तालुक्यातील काळजवडे येथील आनंद शैक्षणिक, सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने मागील महिनाभर ३२ वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील शाळा-महाविद्यालयात जाऊन जनजागृती तसेच वाहतूक सुरक्षेविषयी प्रबोधनपर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ केशवराव भोसले नाट्यगृहात करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांनी वाहतुकीच्या नियमांचं महत्त्व पटवून दिलं. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं. नांदेड येथील सोपानराव तांदळापूरकर क्रीडा मंडळाने पथनाटयाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम आणि वाहन चालवताना घ्यावयाची काळजी याची माहिती दिली.

या वेळी आनंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, शंभूराजे पवार, प्रा. टी. एस. किल्लेदार, अविनाश खडके, प्रसाद बुरांडे, प्रदीप कारंडे यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.