इचलकरंजी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने शेतकरी व कामगारविरोधी धोरणे रद्द करून प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी कामगार संघटनांसह आशा, अंगणवाडी सेविकांनी इचलकरंजी येथे आज (सोमवार) क्रांतीदिनी आंदोलन केले. यावेळी प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी, बांधकाम कामगार, आशा वर्कर, गटप्रवर्तक, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, यंत्रमाग कामगार यामध्ये सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.

बांधकाम कामगारांचे २०१८ पासून लाभाच्या अर्ज धूळखात पडले आहेत. कोरोना आणि महापुराने हाताला काम नाही. औषध आणि उपचारासाठी आबाळ होत आहेत. अनेकांना कोणताही लाभ मिळाला नाही. घरेलू कामगारांना कोविड अनुदानाची घोषणा केली. मात्र अजून हजारो कामगारांना त्याचा लाभ मिळाला नाही. लॉकडाउनमुळे आजही अनेक यंत्रमाग कारखाने बंद अवस्थेत आहेत. शातच सूत दरवाढ, लाईट बिलाचा वाढता बोजा आणि कापडाला मागणी नाही. शासन यंत्रमाग कामगारांना कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात वेळकाढूपणा करत असल्याने कामगार यंत्रमागाच्या धंदा अडचणीत आला असल्याची टीका भरमा कांबळे यांनी केली.

आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांना गेली पाच महिने मानधन मिळाले नाही. त्यामुळे राज्य शासनाचा धिक्कार करत या  आंदोलनात आशा वर्कर मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांसह शेतकरी, कामगारांना जाहीर केलेले अनुदान व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलकांनी केली. दत्ता माने, शिवगोंडा खोत, नेत्रदीपा पाटील,पार्वती जाधव, सुभाष कांबळे, ए.बी.पाटील, सदा मलाबादे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.आंदोलनात सेंटर ऑफ ट्रेड युनियन यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

कामगार कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शहरातील कामगार कृती समितीच्या वतीने भारत बचाव दिवस साजरा करण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना देण्यात आले. शहरी रोजगार गॅरंटी कायदा लागू करा, मनरेगा रोजगार भत्ता वाढवून द्या, बेकार कामगारांना रोजगार द्या, कामगार विरोधी कायदे रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी मारुती आजगेकर, धोंडीबा कुंभार, सुनील बारवाडे, शामराव कुलकर्णी, बंडोपंत सातपुते, महेश लोहार, बजरंग लोणारी आदी उपस्थित होते.