कोल्हापूर (प्रतिनिधी) : रायपूर (छत्तीसगढ) येथे भारतीय तलवारबाजी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा आज (शुक्रवार) पार पडली. या सभेत भारतीय तलवारबाजी संघाच्या अध्यक्षपदी उत्तर प्रदेशचे आ. पंकज सिंह यांची तर उपाध्यक्ष पदी गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

भारतीय तलवारबाजी महासंघाच्या सचिवपदी भारतीय ऑलम्पिक  महासंघाचे सचिव राजीव मेहता, छत्तीसगड ऑलम्पिक महासंघाचे सचिव बशीर अहमद यांची कोषाध्यक्षपदी, तर महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांची सहसचिवपदी बिनविरोध करण्यात आली. यावेळी ऑलम्पिकमध्ये पहिल्यांदा तलवारबाजी खेळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवीला भारतीय तलवारबाजी महासंघाच्या वतीने दहा लाख रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला.

या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे मुख्य सल्लागार शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे, कोषाध्यक्ष राजकुमार सोमवंशी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस. पी जवळकर आदींनी अभिनंदन केले.