कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी नामनिर्देशित केलेल्या बारा जागांवरील नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी घेतलेल्या आक्षेपांची अधिकृत माहिती नाही. घटनेतील तरतुदीनुसार मंत्रिमंडळाने ही नावे त्यांच्याकडे पाठवली आहेत. ते नक्कीच सकारात्मक विचार करतील, असा आशावाद राज्याचे गृहराज्यमंत्री शूंभराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देसाई कोल्हापुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर आमचा भर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना तीनही पक्षांत चांगला समन्वय आहे. शिवसेना दिलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पार पाडेल.

लॉकडाऊनमुळे सरकारच्या तिजोरीत म्हणावे तसे उत्पन्न जमा झाले नाही. आता आर्थिक स्थिती जशी पूर्वपदावर येत आहे. समतोल राखून सर्व विभागांना निधी देण्याची भूमिका सरकारची आहे. ज्या विभागांची निकड आहे, त्यांना सध्या निधी दिला जात आहे. ऊर्जा खाते तोट्यात चालले आहे. या खात्याचाही सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत.

जिल्ह्यातील स्थिती पाहून व पालकांची संमती घेऊन स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. फडणवीस आघाडीत मतभेद निर्माण करीत आहेत. ते विरोधी पक्षनेते असल्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता गृहित धरून कोविड सेंटर कायमस्वरूपी बंद केलेले नाहीत. पुरेसा ऑक्‍सिजन साठा उपलब्ध केला आहे. कोरोनाला सामोरे जाण्याची तयारी सरकारने ठेवली आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीचा दिशा कायदा अंतिम टप्प्यात आहे. त्याविषयी चार ते पाच बैठका झाल्या आहेत. त्याकरिता नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीने त्याचे प्रारूप तयार केले आहे. एक, दोन बैठकांनंतर त्याला मान्यता दिली जाईल.