जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्यासोबत येणार नाही : सदाभाऊ खोत  

0
58

मुंबई (प्रतिनिधी) : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी जोवर जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या संघटनेत परत येणार नाही, असे खोत यांनी म्हटले आहे.

खोत यांनी पुढे म्हटले आहे की, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि ज्या बारामतीला तुम्ही आमदारकीचा तुकडा मागिलता, त्याच बारामतीच्या आदेशाने राज्यातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. सदाभाऊ खोतांना मी काढून टाकले असे सांगून शेट्टी हे स्वतःचे महत्त्व वाढवून घेत आहेत. मात्र, ज्यांनी मला काढलं ते देखील आता तुमच्या सोबत नाहीत, असा टोलाही त्यांनी शेट्टी यांना लगावला. मी राहत असलेल्या झोपडीत महाल आहे आणि तिथे आम्ही सर्व समाधानी देखील आहोत. तुम्ही ज्या महालात गेला आहात तिथे याचक झाला आहात, अशीही तोफ   खोत यांनी डागली.

दरम्यान, ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांच्यासोबतच मी काम करतो. त्यांच्याकडे या दोन्हीही गोष्टी नाहीत. संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केली होती.