मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत त्यावर पक्ष म्हणून त्वरित निर्णय घेऊ, असे सांगत कारवाईचे संकेत दिले आहेत.

पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की धनंजय मुंडे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपाबाबत माझ्याशी भेटून सविस्तर माहिती दिली. त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यातून काही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली. अशा प्रकारची घटना होईल असा अंदाज असल्याने धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयातून न्यायालयीन आदेश प्राप्त केला होता. पण, जे आरोप झाले ते गंभीर स्वरुपाचे असल्याने एक पक्ष म्हणून त्यावर तातडीने विचार करण्याची गरज आहे. मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणार आहे. त्यांची मते जाणून घेत पुढील कारवाई करण्यात येईल.
नवाब मलिक यांच्या जावयावर झालेल्या आरोपाबाबतही आपली भुमिका स्पष्ट केली. त्यांनी नवाब मलिकांवर कोणताही वैयक्तीक आरोप झालेला नाही. जे काही आरोप झालेले आहेत ते त्यांच्या नातेवाईकांवर झाले आहेत. याचबरोबर मलिक तपास यंत्रणांना सर्व सहकार्य करत आहेत. वस्तूस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. तपास यंत्रणांवर माझा विश्वास आहे.