मुंबई (प्रतिनिधी) : नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आता या लढ्याची झळ दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली आहे. शेतकरी गेल्या चार दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलनाच्या तयारीत आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन करण्याला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी केली आहे. दरम्यान अनेक कलाकारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

रविवारीसुद्धा शेतकरी आंदोलनावर ठाम होते. याच पार्श्वभूमीवर अभिनेता, कॉमेडियन कपिल शर्माने ट्विट केले आहे. शेतकऱ्यांवरील कारवाई पाहून संतापलेल्या कपिल शर्माने या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन केले आहे.

कुठलेही प्रश्न सामंजस्याने सोडवता येतात. त्यामुळे या प्रश्नावरही सामंजस्याने तोडगा काढता येईल. याला राजकीय वळण देऊ नका असे आवाहन शर्माने केले आहे. आम्ही सगळे देशवासी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तेच आपले अन्नदाते आहेत, असे म्हणत त्यांने या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.