मुंबई : अखेर आज (शनिवारी) मान्सूनने राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सून दाखल झाला आहे.

शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेला मान्सून शनिवारी मुंबईत दाखल झाला आहे. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला, अशी हवामान खात्याने दिली आहे. पहिल्याच जोरदार पावसामुळे पुणे शहारातील विविध भागात ३० पेक्षा अधिक ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्या. यात काही गाड्यांचे नुकसान झाले. काही भागातील वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडे बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांची पुरती दमछाक झाली.

पहिल्याच मान्सूनपूर्व वादळी पावसाने पुणे शहराला चांगलेच झोडपून काढले. पर्वती येथील शाहू कॉलनी, पुणे स्टेशन येथील जीपीओ, पोलीस आयुक्तालयासमोर, भवानी पेठ बीएसएनएल कार्यालय, स्वारगेट येथे एसटी कॉलनी यासह आदी ठिकाणी झाडे पडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली.