कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये या हंगामातील नवीन हापूस आंब्याची कोकणातून आवक झाली. या आंब्याचा पहिला सौदा आज (गुरुवार) नाविद मुश्रीफ, बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आला.

या सौद्यामध्ये देवगड हापूसच्या एक डझन आंब्याला पाच ते सात हजार रुपये इतका दर मिळाला. तर पाच डझनाच्या पेटीला २५ ते ३० हजार रुपयांचा दर मिळाला. श्री शाहू मार्केट यार्ड मधील इब्राहीमभाई आबाभाई बागवान यांच्या अडत दुकानात देवगड येथील भाई आचरेकर यांच्या एक डझनच्या १५ पेट्यांची आवक झाली तसेच मे.इक्बाल मेहबूब बागवान यांच्या दुकानात हापूस आंब्याच्या पेट्यांची आवक झाली.

या आंब्यांचा चालू हंगामातील पहिला मुहूर्ताचा सौदा करण्यात आला. यावेळी प्रशासकीय मंडळाचे सदस्य सुर्यकांत पाटील, बळीराम पाटील, दगडू भास्कर, सचिव जयवंत पाटील, उपसचिव राहूल सूर्यवंशी, बी. के. पाटील यांच्यासह समितीतील अधिकारी, कर्मचारी, अडते, खरेदीदार, शेतकरी उपस्थित होते.