विनापरवाना भिशीद्वारे पावणेचार लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक…

0
139

करवीर (प्रतिनिधी) : विनापरवाना भिशी चालवून महिलांची ३ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल गांधीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सचिन उर्फ आनंदा कांबळे (वय ३४, रा. बिरदेव मंदिराशेजारी,  गडमुडशिंगी, ता. करवीर) असे त्याचे नाव असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी दिली आहे.

सौ. अश्विनी अनिल दांगट (वय ३४, रा. महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना रस्ता, गडमुडशिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सचिन कांबळेने आपल्याला विश्वासात घेऊन आपण भिशी चालवत असल्याचे सांगितले. दिवाळी आणि गुढीपाडव्याला भिशीचे वाटप करतो आणि १७ टक्के व्याज दिले जाते,  असे आमिष दाखवले. त्यानंतर दांगट यांनी नातेवाईकांसह एका खाजगी शाळेतील महिलांकडून भिशीसाठीचे पैसे प्रत्येक महिन्याला आणून सचिन कांबळेकडे दिली. हा प्रकार १४ ऑक्टोबर २०१९ पासून २५  ऑक्टोबर २०२०  पर्यंत चालू होता. काही महिलांनी ३ लाख ७० हजारांची रक्कम सचिन कांबळेकडे भिशीसाठी भरली. पण त्यानंतर त्याने भिशीच्या रकमेचे वाटप केलेच नाही.

दांगट यांनी वारंवार रकमेसाठी तगादा लावला. पण रक्कम मिळून आली नाही. आपल्यासह संबंधित भिशी भरणाऱ्या महिलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दांगट यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध नियमानुसार आणि फसवणूक केल्याबद्दल सचिन कांबळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.