संजय राठोड यांना अटक करा: भाजप महिला मोर्चाचा रास्ता रोको (व्हिडिओ)

0
137

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तत्काळ अटक करून त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आज (शनिवार) भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, उद्धव ठाकरे जागे व्हा, पूजाला न्याय द्या, शरद पवार जागे व्हा, पूजाला न्याय द्या, सोनिया गांधी जागे व्हा, पूजाला न्याय द्या, अनिल देशमुख जागे व्हा, खुनाचा गुन्हा दाखल करा, आघाडी सरकार हायहाय, पूजाला न्याय द्या, नुसतेच बोलतात गोरे गोरे झाले, थोबाड यांचे काळे, अशा आशयाचे बोर्ड घेऊन महिला मोर्चाने तीन रस्ते अडवून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेऊन काही वेळाने सोडून दिले.

आंदोलनात प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, स्वाती कदम, विद्या बनचोडे, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, गौरी जाधव, दीपा ठाणेकर, कार्तिकी सातपुते, संगीता चव्हाण, सीमा बारामते, वंदना नायकवडी, शुभांगी चितारे, सुषमा गर्दे, मयुरी, विजयमाला जाधव, मयुरी पाटील, जयश्री दबडे, नीलम जाधव आदींनी सहभाग घेतला.