मुंबई (प्रतिनिधी) : ‘आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या…मला अटक करा’ अशा शब्दात संजय राऊत यांनी ईडीने नोटीस पाठवल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना ट्विटवरून एक प्रकारे आव्हानच दिले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहे. शिवसेनेत उफाळून आलेली बंडखोरी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना आता खासदार संजय राऊत यांना गोरेगावमधील पत्रा चाळ भूखंड प्रकरणी समन्स बजावण्यात आल आहे. संजय राऊत यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी करार केला होता. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनला याठिकाणी तीन हजार अधिक फ्लॅट तयार करायचे होते. एकूण फ्लॅटपैकी ६७२ फ्लॅट हे पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरुआशिष फ्लॅटकडे राहणार होते. दरम्यान, गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतंही बांधकाम न करता म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसवणूक केली. गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन १०३४ कोटीला दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

ईडीने अटक केलेले प्रवीण राऊत हे पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान यांच्यासह फर्मचे एक संचालक होते. मार्च २०१८ मध्ये म्हाडाने गुरुआशिष बांधकामांविरोधात एफआयआर दाखल केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती, तर सारंग वाधवन अटकेत होता. त्यानंतर राऊत यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.