नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा मुद्दा उपस्थित करण्यात येणार  आहे. याबाबत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेमध्ये चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव आज (सोमवार)  सादर केला आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असून यावरुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात संसदेमध्ये चर्चा व्हावी, अशी मागणी करत सस्पेन्शन ऑफ बिझनेस नोटीस देण्याची मागणी केली आहे. हे चॅट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे, असे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. आता हा मुद्दा संसदेत गाजणार आहे.