मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे सदा सरवणकर यांच्याकडील रिव्हॉल्व्हरचे लायसन्सदेखील रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात लोकप्रतिनिधी आणि खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार हा विषय आपण मांडला होता. ज्यामध्ये आपण सदा सरवणकर यांचा विषय मांडला होता. या नमूद गुन्ह्यामध्ये 14 साक्षीदार तपासले. या प्रकरणात सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर असे एकूण 11 आरोपींवर कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“त्याचप्रमाणे त्यांचे जे लायसन्सधारी पिस्तूल आहे ते त्यांनी स्वत: सोबत बाळगणे आवश्यक असताना त्यांनी ते गाडीत ठेवले. असे ते ठेवता येत नाही. त्यामुळे आर्म्स अॅक्ट 1969 चे कलम 30 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी लायसन्स आणि शर्थी नियमांचे उल्लंघन केले असल्याने त्यांना जो काही शस्त्र परवाना दिलाय तो रद्द करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
या प्रकरणी 15 दिवसांपूर्वी पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला. सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून हवेत गोळीबार झाला होता. तो गोळीबार सदा सरवणकर यांनी केला नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे गोळीबाराची घटना खरी होती, हे पोलीस तपासातून देखील स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी विधान परिषदेत विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर फडणवीस यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
दादरच्या प्रभादेवी परिसरात काही महिन्यांपूर्वी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे समोर आलेले. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आ. सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता.