Published May 23, 2023

कोल्हापूर : दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठासमवेत येथील शिवाजी विद्यापीठाचा अध्यापन, संशोधन व विस्तार कार्यासाठी सामंजस्य करार झाला. या करारान्वये शिवाजी विद्यापीठात मत्स्यालय आणि जल-जैवविविधता केंद्र साकार करण्यासाठी कृषी विद्यापीठासह त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयांचेही सहकार्य लाभणार आहे.

शिवाजी विद्यापीठ जलसाठ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. पूरस्थितीमध्ये याच पाणवठ्यांमधून संपूर्ण शहरास पाणी पुरवठा करण्याचे कामही विद्यापीठाने केले. या जलस्रोतांमध्ये (विद्यापीठ परिसरातील तळी) विविध प्रकारचे मासे, जलचर यांचे संवर्धन करणे, ज्यायोगे तळ्यातील पाणी निसर्गत: स्वच्छ राहील आणि पाण्यामधील अन्नसाखळी समृद्ध होईल, या दृष्टीने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्नित मत्स्यविज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी यांचे सहकार्य व मार्गदर्शन विद्यापीठास लाभणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात भव्य मत्स्यालय व जल-जैवविविधता केंद्र निर्माण करण्यासाठीही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन लाभणार आहे. शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संशोधकांना औषधी वनस्पतींचे जैवरासायनिक पृथक्करण, औषधी वनस्पती तसेच जंगलात आढळणाऱ्या पण संख्येने कमी प्रमाणात असणाऱ्या वनस्पतींचे टिश्यू कल्चरद्वारे पुनरूज्जीवन करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी कृषी विद्यापीठ व अकृषी विद्यापीठांमध्ये होणारा हा सामंजस्य करार वेगळ्या स्वरुपाचा असून, दोन्ही विद्यापीठांतील सर्व घटकांच्या संशोधनात्मक व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

या सामंजस्य करारामुळे वन्यविज्ञान महाविद्यालय, दापोली व औषधी वनस्पतींवर संशोधन करणाऱ्या कृषी विद्यापीठातील संशोधकांना शिवाजी विद्यापीठातील समृद्ध उपकरण कक्ष, प्रयोगशाळा व संशोधकांच्या ज्ञानाचा लाभ होईल, असे मत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी ऑनलाईन व्यक्त केले.

या सामंजस्य करारप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्राणिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आशीष देशमुख, डॉ. अधिकराव जाधव यांच्यासह अधिविभागातील सर्व शिक्षक, वनस्पतीशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. भावे, मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. शिंगारे, वनशास्त्र महाविद्यालय दापोलीचे डॉ. अजय राणे आदी ऑनलाईन उपस्थित होते. डॉ. भिलावे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी आभार मानले.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023