इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील जयभिमनगर झोपडपट्टीतील प्रलंबित १०८ घरकुलांसाठी ६.४३ कोटी खर्चाचे नवीन अंदाजपत्रक करण्यात आले असून त्याला सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यताही दिली आहे. त्यामुळे प्रदीर्घकाळापासून रखडलेला हा प्रश्‍न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच  लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळेल, अशी माहिती नगराध्यक्षा ॲड सौ. अलका स्वामी यांनी दिली.

आयएचएसडीपी योजना अंतर्गत जयभिमनगर झोपडपट्टीतील ७२० घरकुले मंजूर झाली होती. त्यापैकी ६१२ घरकुलांचे काम पूर्ण होऊन त्याचे संबंधित लाभार्थ्यांना वाटपही करण्यात आले आहे. तर उर्वरीत १०८ घरकुलांचा प्रश्‍न काही तांत्रिक कारणांनी रखडला होता. ही घरकुले तातडीने बांधून मिळावीत यासाठी भागातील लोकप्रतिनिधींसह लाभार्थ्यांकडून सातत्याने मागणी केली जात होती. त्यातच संबंधित मक्तेदाराने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने  हा प्रश्‍न अधांतरीच राहिला होता. घरकुलांसाठी लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनेही केली. या १०८ घरकुलांच्या संदर्भात नगरसेवक व लाभार्थी यांच्याशी चर्चा करुन हा प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. त्या अनुषंगाने प्रलंबित १०८ घरकुलांसाठी नव्याने ६ कोटी ४२ लाख ४० हजार ३२० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्याला सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे येथील मुख्य अभियंता यांनी २८ मार्च २०२१ रोजी मान्यता दिली आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी, लाभार्थी व संबंधित विभागप्रमुखांची बैठक घेऊन कार्यवाही संदर्भात माहिती दिली.

या कामासाठी लागणारा निधी आयएचएसडीपी योजना अंतर्गत प्राप्त अनुदान रक्कम व लाभार्थी हिश्श्याची रक्कम यावरील ४ कोटी ५२ लाख रुपये अखर्चित व्याज वापरण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून मान्यता मिळणेबाबतची कार्यवाही सुरु आहे. तर उर्वरीत रक्कम नगरपरिषद फंड व इतर अनुदानातून उभी केली जाणार आहे. या बैठकीत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, मुख्याधिकारी डाॕ प्रदीप ठेंगल, मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती सौ. संध्या बनसोडे, नगरसेवक पक्षप्रतोद सुनिल पाटील, पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे, नगरअभियंता संजय बागडे, लेखापरीक्षक पेटकर, लेखापाल कलावती मिसाळ, आबा बनसोडे,विकास बनसोडे नितीन कोकणे रणजित आनुसे,आदी उपस्थित होते.