कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेची २९ डिसेंबरला सभागृहाची मुदत संपणार आहे. ओमयक्रोनच्या संसर्ग थोपवण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. त्यासाठी नगरविकास खात्याकडून त्याबाबतचे परिपत्रक पालिकेला प्राप्त झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कार्यभार पालिका प्रशासकांच्या हाती जाणार आहे.

कुरुंदवाड पालिकेचे नगराध्यक्ष आणि नगरसेकांचा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कार्यकाळ समाप्त होणार आहे. नगरविकास विभागाकडून आज (सोमवर) रात्री उशिरा मुदत संपणाऱ्या पालिकेवर प्रशासक नेमणूक करण्याच्या दृष्टीने हे परिपत्रक काढण्यात आले आहे. ते प्रथम जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी केली असून तसे आदेश कुरुंदवाड पालिकेला  काढले आहेत. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड-१९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नाही. मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्यात येत असते. त्यानुसार मुख्य अधिकारी जाधव यांच्याकडे पालिकेचा प्रशासक म्हणून कार्यभार देण्यासाठीचे निश्चित झाले आहे.