मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण २८ सदस्यांचा समावेश असलेल्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. 

आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून ४ पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे. देशभरातून २४ जणांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी मिळाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा करून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केल्याचे सांगितले जात आहे.  तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकार तसेच मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांचा मी आभारी आहे. माझ्या हातून सेवा घडावी यासाठी देवानेच हे द्वार उघडले आहे. हे माझे भाग्य आहे, असे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.