इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात  अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी साफसफाई व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे इचलकरंजी नगरपरिषदेकडील १० कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या वेतनभत्त्यासह प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.

सध्या इचलकरंजी शहरात कोरोना महामारी संकटाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे.  दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण त्याठिकाणी स्वच्छता कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णालयाची साफसफाई व स्वच्छता कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे नगरपरिषदेकडील १० सफाई कर्मचारी तात्पुरत्या कालावधीसाठी रुग्णालयाकडे देण्याची मागणी केली होती.

या संदर्भात ६ एप्रिलरोजी झालेल्या शहर सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभागप्रमुखांची मते जाणून व अडचणींची माहिती घेऊन इचलकरंजी नगरपरिषदेकडील १० कर्मचारी तातडीने रुग्णालयाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तात्पुरत्या स्वरुपात १० कर्मचारी  प्रतिनियुक्तीवर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील दैनंदिन साफसफाई व स्वच्छतेचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.