ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करा : राजू शेट्टी

0
41

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षापासून ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक झाली नसून तातडीने सदस्यांची नियुक्ती करून बैठक घेण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली.

गतवर्षीच्या गळीत हंगामातील जवळपास ३०० कोटी रूपयाहून अधिक रूपयांची एफआरपी थकविली आहे. तसेच यंदाचा गळीत हंगाम संपत आला असून या हंगामातील जवळपास २८०० कोटी रूपयाची एफआरपी थकीत आहे. याबाबत कारवाई करण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई होत असून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक आरिष्टात सापडला आहे.

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीच एक रक्कमी एफआरपीमध्ये मोडतोड करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न पडला आहे. आर्थिक गर्ते सापडलेल्या शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र सध्याचे राज्य सरकार या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी यावेळी केली.