कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड काळजी केंद्रात कोरोनाच्या कालावधीत कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता,स्टाफ नर्स या कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र या ठिकाणी रिक्त पदांवर नियुक्त करावे, अशी मागणी परिचारिका (नर्सेस) कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जीव धोक्यात घालून कोविड काळजी केंद्रात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्मिता, नर्सेस यांनी कंत्राटी पद्धतीने काम केले आहे. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने काही कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. दरम्यान, ‘आम्ही होती ती नोकरी सोडून शासनाला सहकार्य केलं, कोरोनाच्या महाभयंकर काळात आमचा वापर करून घेतला आणि आता आम्हाला कामावरून काढून टाकलं. आम्ही आता नेमकं करायचं काय?’ असा प्रश्न यावेळी परिचारिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे कोविड काळजी केंद्रामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील विविध रिक्त पदावर नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी परिचारिका कर्मचारी सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी डॉ. स्नेहल पाटील, डॉ. विनोद झाडे, डॉ. मुश्ताव, वंदना नांगरे, आश्विनी भालेकर, रेश्मा चांदणे, शितल कांबळे, अंकिता निकम, कुंदा पाटील, नम्रता चव्हाण, पूजा पाटील, सुप्रिया कांबळे, अरुणा पठाडे यांच्यासह जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.