पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या  बारावीच्या परीक्षेसाठी मंगळवारपासून (दि.१५)  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नियमित,  पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून १५ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत अर्ज करू शकतात.  व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी ५ ते १८ जानेवारीपर्यंत  अर्ज करू शकतील. याबाबत मंडळाने ऑनलाइन पत्रक जारी केले आहे.

विद्यार्थ्यांना http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर १२ वीच्या परीक्षेसाठी अर्ज करता येईल. आपले नाव, वैयक्तिक माहिती आणि विषय इत्यादी माहिती भरायची आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून लॉगइनमधून प्री लिस्ट दिली जाणार आ़हे. या प्रीलिस्टची प्रिंट काढून त्यावर विद्यार्थ्यांना स्वाक्षरी करून महाविद्यालयाकडे जमा करावी लागणार आहे.

http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एचएससी  एप्रिल-मे ऑनलाइन अॅप्लिकेशन येथे उपलब्ध होईल. बारावीचा ऑनलाइन माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार,  परीक्षा ऑनलाइन होणार की लेखी याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.